तिसरी लढाई: उंबरठ्या बाहेरचं जग.
घरातली लढाई आम्ही जिंकली होती. स्वाती सोबत होती, आई-वडिलांचा विश्वास आमच्या पाठीशी होता. पण उंबरठ्याच्या आत मिळालेला हा विजय, उंबरठ्याबाहेर पाऊल टाकताच एका नव्या प्रश्नापुढे थांबला.
प्रश्न साधा होता, पण त्याचं उत्तर आमच्याकडे नव्हतं: "ठरवलं तर खरं... पण आता हे प्रत्यक्षात करायचं कसं?"
प्रथमला शाळेत न घालता, नैसर्गिक पद्धतीने त्याचं शिक्षण सुरू ठेवायचं हा निर्णय घेणं सोपं होतं. तो जगणं अवघड. कारण आता शिकवणारे आम्हीच होतो, आणि त्यासाठी आधी पुन्हा एकदा शिकायची पाळी आमच्यावर आली होती.
सुरुवात आम्ही ओळखीच्या वाटेनेच केली. शाळेसारखंच एक वेळापत्रक बनवलं ही वेळ अभ्यासाची, ही खेळाची, ही वाचनाची. काही दिवस आम्ही ते मन लावून पाळलंही.
पण काही दिवसांतच एक अस्वस्थ करणारी जाणीव झाली: जे शाळेत होतं, नेमकं तेच आपण घरी आणून बसवलं आहे. फरक एवढाच की भिंती बदलल्या होत्या. मग आम्ही वेगळं काय करतोय? आणि मुळात आपण जे करतोय, ते बरोबर आहे का? या प्रश्नाचं ठाम उत्तर त्या क्षणी आमच्याकडेही नव्हतं.
आणि बाहेरचं जग तर त्याच्या प्रश्नांची यादी घेऊन तयारच होतं. शेजारी, सोसायटीतली माणसं विचारायची
"प्रथम शाळेत जात नाही? मग त्याचं socialization कसं होणार?"
"तुम्ही त्याला सगळं शिकवणार तरी कसं?"
"तो बाकीच्या मुलांच्या मागे पडेल ना?"
प्रत्येक प्रश्न प्रेमातून आलेला होता, पण प्रत्येक प्रश्न आमच्या निर्णयाला हलवून बघत होता.
आणि मग असं काही घडलं, जे कोणीच ठरवलं नव्हतं कोविड-१९ आणि लॉकडाउन.
रातोरात सगळ्या मुलांच्या शाळा घराच्या चार भिंतींत आल्या. जे आजवर फक्त आमच्या घरात घडत होतं, ते अचानक प्रत्येक घराचं वास्तव बनलं. आणि इथे एक गंमत झाली. जी माणसं काल आम्हाला विचारत होती "तुम्ही मुलांना घरी कसं शिकवणार?", तीच माणसं आता विचारू लागली "हे सगळं तुम्ही घरी कसं करता? आम्हालाही सांगा."
ज्या प्रश्नांनी आमची परीक्षा घेतली होती, त्याच प्रश्नांची उत्तरं आता लोक आमच्याकडे मागत होते. उंबरठ्याबाहेरचं ते जग, जे आजवर आमच्याकडे संशयाने बघत होतं, आता आमच्या उंबरठ्यावर येऊन थांबलं होतं.
इथून खऱ्या अर्थाने बदलाला सुरुवात झाली.
या काळात आम्ही पुन्हा एकदा 'पालक' झालो. आता घरात प्रथम एकटा नव्हता जिजाही होती. आणि गंमत म्हणजे, प्रथमसाठी आम्ही जे चाचपडत, चुका करत शिकलो, तेच जिजासाठी खूप सोपं करून गेलं. प्रथमच्या वाटेवर आम्ही ज्या ठेचा खाल्ल्या, त्या जिजाच्या वाटेवरून आम्ही आधीच बाजूला केल्या. दोघांनाही आता एकच गोष्ट भरपूर मिळत होती स्वतःचं बालपण मनसोक्त जगण्यासाठीचा वेळ.
प्रथम हळूहळू मोठा होत होता. तो सहा वर्षांचा झाला, तेव्हा आम्हाला वाटलं आता त्याला लिहिता-वाचता यायला हवं. पण हे शिकवणारं माणूसही आमच्या विचारांशी जुळणारं हवं. म्हणून आम्ही काही शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या, आणि ज्यांचे विचार आमच्याशी थोडेफार जुळले, अशा एका ताईंना प्रथमला मराठी लिहायला-वाचायला शिकवण्यासाठी बोलावलं.
तोपर्यंत घरात सतत मराठी कानावर पडत असल्याने प्रथम छान बोलायला शिकला होता. शिवाय असंख्य ऑडिओ गोष्टींनी त्याची भाषेशी घट्ट ओळख करून दिली होती. त्यामुळे अक्षरांची ओळख ही त्याच्यासाठी सुरुवात नव्हती ती आधीच रुजलेल्या भाषेला आकार देणं होतं.
आणि तो सगळ्यात मोठा प्रश्न socialization? तो आम्ही नाकारला नाही, उलट गांभीर्याने घेतला. म्हणून महिन्यातून किमान एकदा आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांना, उपक्रमांना दोन्ही मुलांना घेऊन जात असू. तिथे त्यांना त्यांच्या वयाची, आणि त्यांच्याहून मोठी मुलं काय करतात, कशी वागतात, हे प्रत्यक्ष दिसायचं.
याचा परिणाम हळूहळू दिसू लागला. आज एखाद्या नव्या कुटुंबाला किंवा नव्या मुलांना भेटल्यावर, काहीच मिनिटांत त्यांच्याशी बोलणं, खेळणं, मिसळणं प्रथम आणि जिजाला आपोआप जमतं. तिथे आम्हाला मध्ये पडावं लागत नाही. socialization म्हणजे चार भिंतींतल्या वर्गात बसणं नव्हे, तर माणसांत सहज मिसळता येणं आणि ते त्यांना जगातूनच शिकता आलं.
अशा प्रकारे आमच्या 'स्व-अध्ययना'च्या प्रवासाची खरी सुरुवात झाली. उंबरठ्याबाहेरचं जग आता शत्रू राहिलं नव्हतं ते आमच्या प्रवासाचा भाग बनलं होतं.
या प्रवासात आम्ही नेमके कोणकोणते प्रयोग केले, काय काय करून बघितलं, कुठे फसलो आणि कुठून शिकलो.
त्याची एक झलक पाहूया पुढच्या ब्लॉगमध्ये.